बारा गावाच्या, बारा वेशीच्या, बारा वाडीच्या बारा नाक्याच्या, मुंबापुरीच्या बा देवा महाराजा...
होय महाराजा...
आज जो शिमग्याचो सण, सगळी पोरा टोरा, म्हातारे कोतारे...राजकारणी, मतदार, कलाकार, रसिक प्रेक्षक, शेतकरी, व्यापारी, श्रीमंत, गरीब आणि ही वाचक मंडळी मिळान साजरी करतत.. त्येंचो तू नेहमी सांभाळ कर...
आणि सगळ्यांच्या मागे जी काय इडा पिडा असत, वाकडा नाकडा असत ता दूर कर रे राजा...
व्हय महाराजा...
ह्या होळीये वांगडा सगळ्यांच्या मनातलो राग रुसवो जळान खाक होऊ दी.. नि माणसां माणसांवांगडा माणूसकीन नांदू दीत रे राजा...
व्हय महाराजा...
मतदारांनी फायनली उद्या सकाळी सरकार कोणाचा येत हयेचो विचार करत कित्येक रात्र काढल्यांनी.. आणि अखेर आता सरकार स्थापन झाला हा ता टीकां दे.. त्येंच्या हातना लोक कल्याणाची कामा होव दी.. ह्या पावसाच्या आधी तरी रस्त्यांवरचे खड्डे बुजां दीत रे महाराजा...
व्हय महाराजा...
आज जगावर, आपल्या देशावर जी काय करोनाची वाईट नजर पडलेली असा.. ज्येच्या भितीनच सगळ्यांचे घशे खवखवूक लागलेले असत.. नाकातून पाणी येवक लागलेला हा.. कोंब्याचो रस्सो घशातून उतरलेली नसा.. त्या करोनाचो नायनाट करून पुढच्या इतवाराक घरात कोंबो कापलो जाव दी रे महाराज...
व्हय महाराजा...
ह्या होळीये सोबत सगळ्यो जाती पाती बाजूक होवन सगळी माणसांका गुण्यागोविंद्यान नांदूची बुद्धी दी रे म्हाराजा.. सगळ्यांच्या मनातलो क्लेश आणि वाईट वृत्ती होळीयेवांगडा जळून खाक होव दी रे महाराजा...